दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा कायनात दारा यांच्याशी होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पार्थ आणि कायनात यांचा साखरपुडा बुधवार 29 जुलै रोजी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. तर दोघांचं लग्न 27 फेब्रुवारी 2027 रोजी होणार आहे. पार्थ आणि कायनात यांच्या साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका समोर आली असून बुधवारी होणाऱ्या या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
कुठे होणार साखरपुडा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा हा येत्या 29 जुलैला पुण्यातील द रिट्झ-कार्लटन या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. या साखरपुड्याला पक्षातील सगळे आमदार खासदार आणि मोजक्या माजी आमदारांना निमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर पक्ष्यातील प्रमुख नेत्यांना सुद्धा हे निमंत्रण पोहोचले आहे. संबंधित कुटुंबातील सदस्य आणि नेतेमंडळी असे 200 ते 250 लोकांमध्ये पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारीत होणार लग्न :
काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबाकडून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं होतं, ज्यात खासदार पार्थ पवार आणि कायनात दार यांच्या लग्नाविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली. यात सांगण्यात आलेले की, ‘खासदार पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भात समाजात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले व त्याच ठिकाणी विवाहाच्या तारखेची व ठिकाणाची माहिती दिली.
समाजामध्ये कुटुंबातील वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यानंतर, कुटुंबात जर लग्नकार्य होणार असेल तर, एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते अन्यथा पुढील 3 वर्ष घरात लग्नकार्य करता येत नाही अशी यासंदर्भात समजूत प्रचलित आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्नकार्याच्या संबंधित प्रचलित रूढी,परंपरा तथा समजूती संदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले. शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते.परंतु एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज ठेवण्याचे कारण नाही. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचं लग्न हे 27 फेब्रुवारी 2027 रोजी होणार आहे.
कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून?
पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगडच्या आहेत. तर सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. कायनात या मागील काही कार्यक्रमांमध्ये पार्थ पवार आणि कुटुंबासोबत दिसल्या होत्या. कायनात यांची अधिक चर्चा तेव्हा झाली जेव्हा मुंबईत रेवती सुळे यांच्या लग्नाला त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या सोबत एकत्र आल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं तेव्हा सुद्धा कायनात दारा यांना कुटुंबाचं सांत्वन करताना पाहण्यात आलं होतं.
