अतिवर्दळीच्या घाटकोपर स्थानकावर नवा ‘उन्नत डेक’, मेट्रो-लोकल कनेक्टिव्हिटी सुधारणार; कसा-कुठे असेल?

मुंबई उपनगरिय रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मध्य रेल्वेचे सर्व प्रवासी मेट्रो १ वरून घाटकोपर रेल्वे स्थानकावर दाखल होतात. फास्ट लोकलमध्ये प्रवासी अक्षरशः लटकून प्रवास करतात. दररोज गर्दीच्या वेळी स्थानकावर चेंगराचेंगरीसदृष्य स्थिती निर्माण होते. आता घाटकोपरवरील प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. घाटकोपर रेल्वेस्थानकांवरील मेट्रो प्रवाशांसाठी एक नवा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग सुरू झाला आहे.

परिचलनासाठी अतिरिक्त जागा

मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने घाटकोपर रेल्वे स्थानकात एक नवा उन्नत डेक उभारला आहे. या डेकचा पहिला टप्पा शुक्रवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला हा १२ मीटर रुंद पूल बांधण्यात आला आहे. मेट्रो आणि लोकल प्रवाशांसाठी इंटरचेंज मिळणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अतिरिक्त जागा मिळणार आहे. त्यामुळे चालण्यासाठी आणि मेट्रो स्थानकातून लोकल स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.

विद्यमान मेट्रो पुलाला रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील नव्या पादचारी पुलाला जोडण्यासाठी हा ५५ मीटर लांब उन्नत डेक बांधला आहे. मेट्रो स्थानकावर थेट प्रवेश करण्यासाठी ६.१ मीटर रुंदीचा जिना उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील जिना, प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि ४ वरील डबल डिस्चार्ज लँडिंग, मेट्रोला जोडणारा उन्नत डेक आणि पूर्वेकडील स्कायवॉकचा प्रवासी वापर करू शकतात. MRVCच्या मते यामुळे प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल आणि त्यांना लवकरात लवकर रेल्वे स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल.

दुसऱ्या टप्प्यात कसा होईल फायदा?

दुसऱ्या टप्प्यात दक्षिण टोक्याच्या पादचारी पुलाचं काम पूर्ण केलं जाईल. हा पूल पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना सुलभ प्रवेश मिळण्यासाठी पुलावर प्लॅटफॉर्म क्रमांक २/३, ४ आणि पूर्वेकडे अतिरिक्त पायऱ्या असतील. याशिवाय पुलावर सहा सरकते जिने आणि चार लिफ्टसुद्धा उपलब्ध असतील. संपूर्ण डेकवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक घोषणा प्रणाली आणि आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांच्या सल्ल्याप्रमाणे दिशादर्शक फलकंही लावण्यात आली आहेत.
MRVCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास एस.वाडेकर यांच्या मते मुंबईतील उपनगरिय रेल्वेवरील पायाभूत सुविधाच्या आधुनिकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. “घाटकोपर रेल्वे स्थानकावर उन्नत डेक आणि साऊथ-एंड फूट ओव्हर ब्रिज सुरू झाल्यामुले स्थानकांच्या अभिसरणात मोठी सुधारणा होईल, मेट्रो-रेल कनेक्टिव्हीटी मजबूत होईल आणि गर्दीपासून नागरिकांना दिलासा मिळेल,” असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *