लोकलमध्ये हाणामारीचे सत्र सुरुच असून दोन नव्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकलमध्ये विडी ओढणाऱ्या प्रवाशाला जाब विचारल्याने त्याच्यासह तिघांनी एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ठाणे ते दिघा गाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली. तर, दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात जबरदस्तीने घुसलेल्या दोघांनी एकाला ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान मारहाण केली.
विडी ओढल्यावरुन मारहाण
मुलुंड येथे राहणारे ४६ वर्षांच्या तक्रारदाराने सोमवारी सायंकाळी दिघा येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून नेरूळ लोकल पकडली. ते लोकलच्या मालडब्यातून प्रवास करत होते. त्यावेळी एक व्यक्ती विडी ओढत होती.
सोनसाखळी आणि पाकीट चोरीला
विडीच्या धुराने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्या व्यक्तीला विडी ओढण्यास मनाई करीत त्याचा मोबाइलमध्ये फोटो काढला. याच रागातून त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली. यावेळी झटापटीत तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी, पाकीट चोरीला गेले.
दिव्यांग डब्यात मारहाण
दुसऱ्या प्रकरणात कल्याण येथील एका ५२ वर्षांच्या व्यक्तीला ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. ते मुलुंड-कल्याण असा दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होते. दिव्यांग नसतानाही ठाणे रेल्वे स्थानकात या डब्यात घुसलेल्या दोन व्यक्तींना त्यांनी दिव्यांगाच्या डब्यात न चढण्याबाबत सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने या दोघांनी त्यांना मारहाण केली.
वाद टाळा, सुरक्षित प्रवास करा
रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्याबरोबरच लोकल प्रवास अधिक सुरक्षित व वादमुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम राबवली. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवन रक्षा अभियान’ आणि ‘वादमुक्त रेल्वे प्रवास’ या उपक्रमांतर्गत प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.
