पुण्यात रेल्वे फाटके हद्दपार! नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्ग बांधणार; कुठे-कसे असतील मार्ग?

पुणे शहरातील रेल्वे फाटकांमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (महारेल) नऊ ठिकणी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी), भुयारी मार्ग ( आरयूबी) आणि पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येणार आहेत. महापालिकेने ‘महारेल’कडे प्राधान्यक्रमाची अंतिम यादी पाठविली असून, या प्रकल्पांचे सर्वेक्षण, आराखडे आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमातून ‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील १३१ रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. याशिवाय रेल्वे फाटक नसलेल्या मात्र वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या ८० ठिकाणांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. या ८० पैकी चार ठिकाणे पुणे शहरातील होती. त्यात महापालिकेने आणखी पाच ठिकाणांचा समावेश केला. शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याची विनंती ‘महारेल’चे महाव्यवस्थापक (नियोजन) जितेंद्रकुमार यांना महापालिकेने केली आहे.

पूर्व पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा

हडपसर, घोरपडी, सासणेनगर, मांजरी, ससून रस्ता, रेंज हिल्स आणि खडकी परिसरात रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागतात. नागरिकांचा वेळ वाया जातो. अनेकदा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडकून पडावे लागते. प्रस्तावित उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक अधिक वेगवान होण्यास, इंधनाची बचत होण्यास आणि रेल्वे फाटकांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

निधीची जबाबदारी ‘महारेल’वर

या सर्व प्रकल्पांसाठी निधी ‘महारेल’ उभारणार आहे. त्यासाठी ‘हुडको’ किंवा अन्य संस्थांकडून वित्तपुरवठा केला जाईल. निधीची प्रमुख जबाबदारी ‘एमआरआयडीसी’कडे असून, महापालिकेवरील आर्थिक भार कमी होणार आहे. महापालिकेने दिलेल्या प्राधान्य यादीनुसार ‘महारेल’ प्रत्येक प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण, वाहतूक अभ्यास, तांत्रिक व्यवहार्यता अहवाल, प्राथमिक आराखडे आणि खर्चाचा अंदाज तयार करील. त्यानंतर रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामे सुरू होतील.

रेल्वे उड्डाणपूल

गोडबोले वस्ती -विलास वामन घुले रस्ता
सय्यदनगर-सासणेनगर
उद्योगनगर-गणपती चौक
पुणे-दौंड रेल्वे मार्ग, गेट क्रमांक २

रेल्वे भुयारी मार्ग

रेंज हिल्स शासकीय कुक्कुटपालन केंद्राजवळ
रेंज हिल्स (खडकी पोलिस ठाण्याजवळ)
काळे बोराटेनगर- पादचारी व दुचाकींसाठी भुयारी मार्ग
पंचशीलनगर – मीरानगर- पादचारी पूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *