छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले

ज्या घरात आनंदाने संसार थाटला, त्याच घरात एका 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेचा असा दुर्दैवी अन् करुण अंत होईल, असा विचारही तिच्या माहेरच्यांनी केला नव्हता. संगणक अभियंता असलेल्या पतीसह सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून 30 वर्षीय विवाहितेनं आपलं जीवन संपवलं. ‘माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसून, सासरच्या त्रासानेच तिचा बळी घेतला आहे’, असा संतप्त आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे 8 वर्षे आणि अवघ्या अडीच वर्षांची दोन चिमुकली मुले आईच्या मायेच्या छत्रछायेला कायमची पारखी झाली आहेत.

नेमकी घटना काय?

कोमल योगेश मोरे (वय 30, रा. बजाजनगर) असं मयत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोमलचा विवाह 2016 मध्ये संगणक अभियंता योगेश मोरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही ठीक चाललं होतं. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कोमलचे सासरे रेवनाथ मोरे यांनी कोमलच्या वडिलांना फोन करून ‘कोमल उठत नाहीये, ती बेशुद्ध आहे’, असं सांगितलं. ही बातमी ऐकताच कोमलचे वडील आणि भाऊ डॉ. कृष्णा पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

धावतपळत बजाजनगर येथील घरी पोहोचलेल्या भावाने व वडिलांनी पाहिले तर समोरील दरवाजा बंद होता. मागच्या दरवाजाने आत जाऊन पाहिले असता, कोमल तिच्या खोलीत निस्तेज आणि बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या अंगावर छळाच्या खुणा असून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, असा थेट आरोप कोमल यांच्या भावाने केला आहे.

चिमुकल्यांचे अश्रू पाहावेना

आई निघून गेल्याचं भानही नसलेली 8 वर्षांची आणि अडीच वर्षांची दोन लहान मुले जेव्हा आई शोधत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. याप्रकरणी कोमलचा भाऊ डॉ. कृष्णा राजधर पवार (रा. वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि केलेल्या गंभीर आरोपांवरून वाळूज पोलिसांनी संगणक अभियंता पती योगेश मोरे, दीर (भाया) सचिन मोरे, सासरे रेवनाथ दौलत मोरे आणि सासू कांता मोरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *