पावसाच्या दिवसांमध्ये अनेक दुर्गप्रेमींची पावलं गडकिल्ल्यांच्या दिशेनं वळतात. मात्र, याच दिवसांमध्ये निसर्ग त्याच्या रुद्रावतारानं हादरवून सोडतो हेसुद्धा खरं. नुकतंच हरिश्चंद्रगडावर याची प्रचिती आली. भंडारदरा परिसरातील हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवार, 19 जुलै 2026 रोजी घडली.
रविवारच्या सुट्टीमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पावसाची रिमझिम सुरू असताना हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असलेल्या मालाड येथील दहा पर्यटकांवर आडव्या कड्याच्या मागील बाजूस अचानक माती आणि दगड कोसळले. या घटनेत चार पर्यटक गंभीररित्या जखमी झाले.
