मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! सुमारे अडीच हजार घरांची सोडत लवकरच; कधी होणार घोषणा?

म्हाडा मुंबई मंडळाच्या सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या अर्जदारांसाठी पुढील आठवड्यात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाकडून सोडतीचा अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

म्हाडाने ३० मार्च रोजी मुंबईतील दोन हजार ६४० घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या योजनेसाठी ७५ हजार ३६६ अर्ज प्राप्त झाले. सुरुवातीला १५ मे रोजी संगणकीय सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी अर्ज आल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आणि सोडतीची तारीख ५ जून अशी निश्चित करण्यात आली. त्यानंतरही अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. तसेच, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर नव्या तारखेची घोषणा करण्याचे म्हाडाने नमूद केले. मात्र, जुलैचा अर्धा महिना उलटूनही सोडतीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने अर्जदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती.

घरासाठी भरलेली अनामत रक्कम अनेक महिन्यांपासून अडकून पडल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना अनेक अर्जदारांनी व्यक्त केली होती. तसेच, सोडतीतील विलंबामुळे घरखरेदीचे नियोजनही रखडल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात येत होती. आता पुढील आठवड्यात अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार असल्याने अर्जदारांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोडतीची तारीख, अंतिम अर्जदारांची यादी आणि पुढील प्रक्रिया याबाबतची माहितीही म्हाडाकडून प्रसिद्ध केली जाईल.

पुण्यातही म्हाडाची सोडत

मुंबई-पुणे महामार्गालागत हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ६३४ घरांची सोडत जाहीर केली आहे. ताथवडे प्रकल्पात तब्बल ७९२ घरं असून त्यापैकी ६३४ घरांची सोडत जाहीर केली आहे. रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार २० जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्टपर्यंत सोडतपूर्व प्रकिया पूर्ण केली जाईल आणि मग २५ ऑगस्ट रोजी सोडत काढली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *