15 डब्यांच्या लोकलमधून प्रवाशांना दिवा, डोंबिवली आणि स्थानकांवर उतरता येणार नाही? मध्य रेल्वेने दिलं स्पष्टीकरण

मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांचा प्रवास सोप्पा व गर्दीमुक्त व्हावा यासाठी सोमवारपासून 15 डब्यांच्या 10 नवीन फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळं कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमुळं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

15 डब्यांच्या 10 नवीन फेऱ्या चालवण्यात येणार असल्यामुळं कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र मुंबई लोकलच्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, मुंबईतील नवीन 15 डब्यांच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकात उतरायची परवानगी नाही. या स्थानकांवर प्रवाशांना फक्त चढण्याची परवानगी आहे, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच, जर कोणी दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर या ट्रेनमधून उतरले तर त्यांच्यावर मध्य रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हायरल झालेल्या या परिपत्रकावर मध्य रेल्वेचा लोगोदेखील आहे. तसंच, परिपत्रकाच्या शेवटी वरिष्ठ रेल्वे व्यवस्थापकाची सहीदेखील करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर हे परिपत्रक व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संतापदेखील व्यक्त केला होता. मात्र मध्य रेल्वेने या पत्रकाची गंभीर दखल घेतली आहे. तसंच, हे परिपत्रक फेक व दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून हे बनावट परिपत्रक कोणी तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तयारी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. तसंच, हे परिपत्रक कुठेही फॉरवर्ड करू नका, असंही म्हटलं आहे.

15 डब्यांच्या 10 नव्या फेऱ्या

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सोमवारपासून 15 डब्यांच्या 10 नवीन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

या 10 लोकल सेवांमध्ये सीएसएमटी – अंबरनाथ, सीएसएमटी – कल्याण, सीएसएमटी – बदलापूर आणि सीएसएमटी – कर्जत; तसेच परतीच्या प्रवासातील लोकलचा समावेश आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या एकूण उपनगरीय फेऱ्यांची संख्या1,820 इतकीच कायम राहणार असून भविष्यात कसारा मार्गावरही 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.गर्दीमुळे लोकलला लटकून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवासी लोकलमधून पडून अपघात होत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. याचाच भाग म्हणून मध्ये रेल्वेने 12 डब्यांच्या गाड्यांचे 15 डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. 15 डब्यांच्या लोकल सीएसएमटी – कल्याणपर्यंत धावत होत्या. तर, आता 20 जुलैपासून कर्जत दिशेने धावतील. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. प्रत्येक फेरीत 3 अतिरिक्त डबे जोडल्यामुळे गाडीची प्रवासी क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे.

डाऊन मार्गावर सकाळी 9.15 वाजता सीएसएमटी – अंबरनाथ लोकल, दुपारी 12.26 वाजता सीएसएमटी – कल्याण, दुपारी 3.03 वाजता सीएसएमटी – बदलापूर लोकल, सायंकाळी 6.21 वाजता सीएसएमटी – कर्जत लोकल, रात्री 11.08 वाजता सीएसएमटी – अंबरनाथ (धिम्या गतीवरून जलद गतीमध्ये रूपांतरित) चालविण्यात येणार आहे. तर, अप मार्गावर सकाळी 7.51 वाजता अंबरनाथ – सीएसएमटी लोकल, सकाळी 11.03 वाजता अंबरनाथ – सीएसएमटी (धीम्या गतीवरून जलद गतीमध्ये रूपांतरित), दुपारी 1.36 वाजता कल्याण – सीएसएमटी लोकल, दुपारी 4.47 वाजता बदलापूर – सीएसएमटी लोकल, रात्री 8.38 वाजता कर्जत – सीएसएमटी लोकल चालविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *