दुप्पट सोन्याचं आमिष, नाशिकच्या माजी महापौरांच्या 200 तोळे दागिन्यांची लूट; सराफानं गंडवलं, प्रकरण काय?

 घरगुती सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक यांच्या कुटुंबाला तब्बल दोनशे तोळे सोन्याचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित योगेश दाभाडे हा सराफ व्यावसायिक असून, दोघांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दाभाडे याचे मुर्तडक यांच्या घरी ये-जा सुरू झाली. त्याने घरातील महिलांचा विश्वास संपादन केला. मुर्तडक यांच्या आई व मावशी यांनी मृत्यूपूर्वी त्यांचे स्त्रीधन घरातील महिलांना वाटून दिले होते. त्यात मुर्तडक यांच्या पत्नीकडे शंभर तोळे, मुलीकडे पन्नास तोळे, तर सुनेकडे पन्नास तोळे सोने होते. हे सर्व सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून दाभाडे याने १ जानेवारी २०२५ पूर्वी घरातील महिलांकडून ते ताब्यात घेतले.

सोने ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने सहा महिने कोणतीही हालचाल केली नाही. मूळ सोने किंवा वाढीव सोने काहीच मिळत नसल्याचे पाहून महिलांनी हा प्रकार मुर्तडक यांच्या कानावर घातला. त्यानंतर मुर्तडक यांनी संशयिताला घरी बोलावून, ‘वाढीव सोने नको, आमचे मूळ सोने परत कर’ अशी विनंती केली. मात्र, संशयिताने सतत टाळाटाळ केली आणि विविध कारणे देत वेळ मारून नेली. दीड वर्ष उलटूनही हक्काचे सोने परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, माजी महापौरांसारख्या व्यक्तीच्या घरात संशयिताने तब्बल दोनशे तोळे सोन्याचा अपहार केल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *