डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. न्यायालयानं संध्याकाळी ५ पर्यंतची मुदत दिली होती. त्याच्या काही तास म्हात्रेनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
कल्याण न्यायालयानं रमेश म्हात्रेला दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला. अनेक गुन्हे नावावर असलेल्या रमेश म्हात्रेला जामीन देणाऱ्या कल्याण न्यायालयाबद्दल उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं होतं. १९ जुलैच्या संध्याकाळी ५ पर्यंत पोलिसांसमोर हजर न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी रोखठोक भूमिका न्यायालयानं घेतली. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर रमेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात नेलं आहे. उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर कल्याण न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांवर हल्ला झाला. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांवर हात उगारला. या प्रकरणी कल्याण न्यायालयानं म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे आधारवाडी तुरुंगात असलेल्या म्हात्रेच्या सहकाऱ्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. सोबतच म्हात्रेला दिलासा मिळाला. म्हात्रे विरोधात १८ गुन्हे दाखल असले तरीही १७ गुन्ह्यांत त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. म्हात्रे आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा युक्तिवाद म्हात्रेच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता. पण उच्च न्यायालयानं म्हात्रेला दणका देत त्याचा जामीन रद्द केला.
डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. इंडियन मेडिकल असोसिएशननं या घटनेचा निषेध करत २० जुलैला राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. पण उच्च न्यायालयानं म्हात्रेचा जामीन रद्द केल्यावर संघटनेनं बंद मागे घेतला. पोलिसांसमोर शरणागती पत्करणाऱ्या रमेश म्हात्रेला न्यायलयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे.
