आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

आजीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून विजापूरच्या दिशेने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचं अपघाती निधन झालं आहे. रामा बाळू माशाळ (वय ३०, मूळ रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असं मृत तरुणाचं नाव असून अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एका अंत्ययात्रेला निघालेल्या तरुणाचीच अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबीयांवर ओढावली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामा माशाळ हा लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथून रविवारी पहाटेपूर्वी दुचाकीवरून विजापूरकडे निघाला होता. त्याच्या आजीचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला वेळेत पोहोचण्यासाठी त्याने एकट्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. दख्खन गावच्या बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील आंबा घाटातील वळणावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की रामा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या रामाला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पोलीस विविध तांत्रिक माध्यमांच्या साहाय्याने वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे रामाच्या नातेवाईकांनी त्याला रात्रीच्या वेळी दुचाकीने एकट्याने जाऊ नकोस, आपण सर्वजण चारचाकी वाहनाने एकत्र जाऊ, असा वारंवार आग्रह केला होता. मात्र रामाने तो आग्रह नाकारत एकट्याने प्रवास सुरू केला. “त्याने आमचे ऐकले असते, तर आज माझा भाचा आमच्यात असता,” अशी अश्रूंनी भरलेली प्रतिक्रिया त्याचे मामा बाळू तांबे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *