3 मेट्रो स्थानकं बंद; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईपर्यंत; दादरमध्ये सायंकाळी…

 सोनम वांगचूक आणि सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आंदोलन आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन या धर्तीवर दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क असून, जंतर मंतरवर कोणताही मोर्चा निघणार नसून कमाल मर्यादा केरळ भवनपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली. या मर्यादेपलीकडे कोणालाही जाण्याची परवानगी दिली जाणार नव्हती. मात्र परिस्थिती चिघळली आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.

दिल्लीतील सद्यस्थिती पाहता सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही हयगय केली जाऊ नये यासाठी जंतर मंतर, पार्लामेंट स्ट्रीट, सेंट्रल विस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक अशा मुख्य भागांमध्ये ‘थ्री टीअर’ सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर, दिल्लीत निमलष्करी दलाचाही मोठा फौजफाटा पाहायला मिलत आहे.

सध्या सुरू असणारं आंदोलन आणि या आंदोलनाला मिळणारं गंभीर वळण पाहता नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व मार्गांवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर इथं वाहनांचीसुद्धा झाडाझडती घेतली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील केंद्रीय सचिवालयासह 5 मेट्रो स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वारं बंद करण्यात आली होती, ज्यानंतर सचिवालय आणि राजीव चौक या स्थानकांचे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. मात्र जनपथ पटेल चौक, केंद्रीय सचिवालय आणि तीर्थ मेट्रो स्टेशन ही स्थानकं पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली.

मुंबईसह महाराष्ट्रात पडसाद… 

राज्यातून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. राज्याच्या विविध भागात आंदोलनाच्या माध्यमातून वांगचुक यांना पाठिंबा दिला जातोय. आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून तरुणांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. दादर येथील चैत्यभूमी परिसरात हे आंदोलन संध्याकाळी होणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दिल्लीत तरुणांवर लाठीचार्ज केल्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.

तीन स्वतंत्र गुन्हे

दरम्यान, रविवारी पार पडलेल्या ठाकरेंच्या आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आयोजकांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरेंच्या आंदोलन आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल झाला असून, आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिक ठिकाणी आंदोलन केलं. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केला आहे. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *