पंढरीच्या वाटेवरी पाच वर्षे आरोग्यवारी; नाशिकचे ‘सुयोग’ 50 हजार वैष्णवांची करणार सेवा

 मुखी नाम अन् डोईवर तुळस किंवा स्वत:च्याच वाणसामानाचे ओझे घेऊन शेकडो मैल अंतर केवळ पाऊलांच्या बळावर कापणाऱ्या वैष्णवांच्या आरोग्यासाठी मूळ नाशिककर असणारे एक डॉक्टर पंढरीच्या वारीत सलग पाच वर्षांपासून अथक धावत आहेत.

पंढरीनाथाच्या दर्शनाच्या ओढीने आसुसलेल्या नजरांना स्वत:चे आरोग्य, तळापायीचे फोड-जखमा अन् कुठलेही दुखणे लगाम घालत नाही. अशा वैष्णवांच्या सेवेसाठी आयफेलो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुयोगकुमार भवरे यांनी सेवाभावी सहकाऱ्यांद्वारे यंदाच्या वारीत तब्बल ५० हजार वैष्णवांच्या सेवेचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सलग पाच वर्षांपासून डॉ. सुयोग यांची ‘आरोग्यवारी’ त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूरक साधनांची अनुपलब्धता आणि उपलब्ध मनुष्यबळावरच आरोग्य वारीचा संकल्प त्यांनी सोडला. यानंतर दरवर्षी अखंडितपणे दोन ते तीन आठवडे वारीमध्ये आरोग्यसेवेद्वारे योगदान देण्याचा संकल्प ते पूर्ण करीत आहेत. डॉ. भवरे व संपूर्ण टीम लोणंद ते पंढरपूर, जेजुरी ते वाखरी या पालखी मार्गावर दिवसरात्र मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहे.

यंदादेखील १३ जुलै ते २४ जुलै २०२६ दरम्यान चालणाऱ्या या ११ दिवसांच्या प्रवासात ही टीम वारकऱ्यांसाठी अहोरात्र राबत आहे. फक्त प्राथमिक उपचार नाही, तर मिलिटरीच्या धर्तीवर रुग्णालय उभारून हजारो वारकऱ्यांना औषधे, आपत्कालीन उपचार, सलाइन आणि इंजेक्शन्स दिली जात आहेत.

लोकसहभागातून उभी राहिलेली ‘सेवायात्रा’
लाखो वारकऱ्यांसाठी शासनासह असंख्य सेवाभावी संस्थांचेही सेवाकार्य असताना पुरेशी साधने व मनुष्यबळाशिवाय आपण वेगळी सेवा काय करणार, असाही प्रश्न काहींनी उभा केला होता. मात्र, वैष्णवांची सेवा म्हणजे श्री विठ्ठलांची सेवा या भाववेने आयफेलो फाउंडेशनच्या प्रत्येक सहकाऱ्याने योगदान दिले अन् आता या कार्यास आकार येण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. सुयोगकुमार यांनी सांगितले. यंदा वैद्यकीय क्षेत्रातील काही संस्थांच्या वतीनेदेखील सामाजिक दायित्वाच्या निधीद्वारे औषधे व वैद्यकीय सेवेची उपयोगी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *