हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी मिळणार आहे. म्हाड़ा काहीच दिवसांत तब्बल पाच हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. वसई-विरारमध्ये घर घ्यायचे असल्यासही मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळं कमी किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडा परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देत असल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. दरवर्षी प्रत्येक मंडळाची एक तरी लॉटरी काढण्याचा म्हाडाचा विचार आहे. त्यानुसार आता म्हाडाच्या कोकण मंडळाने सुमारे पाच हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.
कोकण मंडळाने 5,285 घरांची लॉटरी काढली होती यासाठी अनामत रकमेसह तब्बल 1 लाख 54 हजार 427 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे यंदाही रेकॉर्डब्रेक अर्ज प्राप्त होणार याकडे लक्ष लागले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई, विरार येथील तब्बल पाच हजार घरांच्या विक्रीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सध्या म्हाडाकडे स्वतः बांधलेल्या घरांचा साठा मर्यादित असला तरी खासगी विकासकांकडून मिळालेली जवळपास एक हजार घरे उपलब्ध आहेत. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातून 20 टक्के योजनेअंतर्गत आणखी सुमारे चार हजार घरे उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरांची जुळवाजुळव पूर्ण होताच सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अर्जदारांची प्रतीक्षा संपणार
म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला असून अर्जदारांची तीन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या आठवड्याचा शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संगणकीय सोडत काढण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. म्हाडाने 30 मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, ‘गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल वडाळा येथील 2,640 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या घरांसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन तीन महिने झाले तरी संगणकीय सोडतीची तारीख ठरत नसल्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. अखेर आता अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे.
