आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ

जामखेड-श्रीगोंदा मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण श्रीगोंदा तालुका हादरला. पाटोदा गरडाचे गावाजवळ रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सुरु असलेल्या एकेरी वाहतुकीदरम्यान चारचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात श्रीगोंद्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले दोन चुलतभाऊ जागीच ठार झाले.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर दोघांचेही शव वाहनात अडकून पडले होते. या दुर्घटनेत निखिल मोतीलाल बहुरे (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, श्रीगोंदा) आणि रामचंद्र महाजन बहुरे (मोजणीदार, पाटबंधारे विभाग, श्रीगोंदा) या दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून सध्या श्रीगोंद्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.

चुलतभाऊ गावातून नोकरीला निघालेले

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दि. १९ जुलै रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून श्रीगोंद्याकडे नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर समोरासमोर जोरदार धडक बसली.

रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करुन केवळ एकाच लेनवरून वाहने सोडली जात होती. याच ठिकाणी दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *