भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर बस रसत्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच, दोन बेस्ट कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे सोमवारी सकाळी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द मेट्रो स्थानकाच्या खाली उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

जखमींवर उपचार सुरू

सोमवारी, २० जुलै रोजी, सकाळी ९.१४ च्या सुमारास बस क्रमांक ५०१ मानखुर्द येथे रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. यामुळे वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर प्रवाशांची मोठा प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दुभाजकाजवळ उभे असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला धडकली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५ वर्ष) अशी पटली आहे. याशिवाय बसचालक बनवारी श्रीराम प्रसाद वर्मा (वय वर्ष ५१) आणि कंडक्टर वैभव वाघमारे (वय वर्ष ४१) हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील राजावाडी रुग्णालायत दाखल करण्यात आलं असून स्थिती सध्या स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *