आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २८ रस्त्यांना मंजुरी देतानाच तपोवनातील महत्त्वाच्या जनार्दन स्वामी मठ-लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याला अखेर सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे.
या रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी प्राधिकरणाने अवघा १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, १५ कोटींत या रस्त्याचे काम होऊ शकत नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केल्याने सिंहस्थापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविक, साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध कामे करण्यासाठी पालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. त्यात जनार्दन स्वामी मठ, लक्ष्मीनारायण पूल ते ड्रीम सिटी दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, या निधीतून रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण शक्य नसल्याचा दावा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्राधिकरणाकडे केला होता.
या रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी
तपोवनाला जोडणारा जनार्दन स्वामी मठ ते ड्रीम सिटी चौक हा रस्ता सिंहस्थासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने केली होती. अखेर प्राधिकरणाने महापालिकेच्या मागणीला मंजुरी दिली असून, या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली.
