कधी मुसळधार पाऊस, तर कधी उन्हाचा चटका; एल निनोमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती?

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी खरीपाची पेरणी करतात. महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला. शहरातील धरणांमधील जलसाठाही भरला. पण दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारली. शिवाय संपूर्ण आठवडा पाऊस होणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ३०-४०% तूट आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ५०-७० टक्के तूट आहे. जुलैच्या सुरुवातीला पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता मोसमी वाऱ्यांना चालना देणारी कोणतीही प्रणाली सक्रिय नाही.

अचानक मुसळधार पाऊस कशामुळे पडला?

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. जुलै महिन्यात तो आणखी तीव्र होणार होता. परिणामी १०-१५ जुलैपर्यंत उत्तर, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला. याशिवाय मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशनचा(MJO) मान्सूनवर मोठा प्रभाव झाला आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आणि ९ जुलैपर्यंत देशभर व्यापला. मान्सूनच्या संथ गतीमुळे जून महिनाही कोरडाच होता. मान्सूनपूर्व पावसाचीही देशात तूट होती. जुलैची सुरुवात होताच ही परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठा वाढला. पण त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिली.

अस्थिर मान्सूनचा अंदाज

यापूर्वीही एल निनोचा भारतात असाच प्रभाव दिसून आला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली. जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सूनला आणखी एका हवामान प्रणालीमुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात येईल. पण हवामान शास्त्रज्ञांनी तरीही सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला आहे. यंदाचा मान्सूनचा हंगाम अत्यंत अस्थिर असेल असा त्यांचा अंदाज आहे.

दरम्यान, अमेरीकेतील हवामान खातं NOAA एल निनो येत्या काही महिन्यात आणखी तीव्र होणार असून इतिहासातील सर्वात तीव्र बनू शकतो. २०२६ सह २०२७ पर्यंतही एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची ९७ टक्के शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हिवाळ्यापर्यंत सुपर एल निनो सक्रिय होण्याची ८१ टक्के शक्यता आहे. त्यामुळे यंदा भारतातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *