: पुण्यामधील मोशीतील भीषण दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला. एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यानं इमारतीचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला नव्हता. यावर ही आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि कंत्राटदार कंपनीसह पालिकेचं पर्यावरण विभागही अडचणीत आलं आहे.
लग्नाची हळद उतरायच्या आत काळाने घातला घाला
मोशीतील आदर्शनगर येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महेश सुरेश कुंभार (वय ३३) सव्वा वर्षांपासून ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात एचआर विभागात कार्यरत होते. कार्यालयीन इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. २२ जून २०२६ रोजीच त्यांचा विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत असतानाचा नियतीने त्यांच्यावर घाला घातला. पत्नी शिवानी, आई-वडील आणि कुटुंबीयांच्या आनंदावर एका क्षणात विरजण पडले. लग्नाची हळदही उतरली नव्हती, तोच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
राहुलच्या जाण्याने कुटुंबावर आर्थिक संकट
राहुल धोंडिबा गायकवाड (वय ३३) हे त्यांच्या कुटुंबाचा एकमेव कमावत आधार होते. राहुल तीन वर्षे कचरा डेपोत प्रयोगशाला सहायक म्हणून काम करीत होते. वृद्ध वडील धोंडीबा आणि आई संपदा यांचा औषधोपचार, घरखर्च तसेच सहा वर्षांचा आरव आणि दोन वर्षांचा स्वराज यांच्या शिक्षणाची जबाबदारी राहुल यांच्यावरच होती. पत्नी अश्विनी यांच्यावर दोन लहान मुलांचे संगोपन, सासू-सासऱ्यांची जबाबदारी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाचे मोठे ओझे आले आहे. मुलांच्या शिक्षणापासून दैनंदिन खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीची चिंता कुटुंबाला सतावत असून, राहुल यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबाचा आर्थिक कणा अक्षरश: मोडला आहे.
पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेली भीषण दुर्घटनेप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास ८३ तास मदत व बचावकार्य सुरू राहिलेल्या पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी अखेर कारवाईला वेग आलाय. पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झालेत. त्यांनी या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात पालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. यातील गुप्तांना पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नोटिशीला २४ तासांच्या आत उत्तर दिल्यानंतर संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राज्याच्या नगरविकास विभागाने विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून, या दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याचं काम सुरू आहे.
