जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. गोलंदाजी करत असताना 22 वर्षीय क्रिकेटपटू सुहैल अहमद याची अचानक प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.
सामन्यादरम्यान अचानक प्रकृती खालावली
डोडा जिल्ह्यातील भलेसा परिसरात सुरू असलेल्या स्थानिक प्रीमियर लीग स्पर्धेत कुलशारी (भद्रवाह) गावचा रहिवासी सुहैल अहमद आपल्या संघाकडून खेळत होता. सामन्यात गोलंदाजी करत असताना एक चेंडू टाकल्यानंतर त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुरुवातीला त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. मैदानावरील सहकारी खेळाडू त्याच्या मदतीला धावले, पण काही मिनिटांतच सुहैल बेशुद्ध होऊन मैदानावर कोसळला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच संपली झुंज
घटनेनंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने सुहैलला जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्थानिक माध्यमांनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
परिसरात शोककळा
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चेनाब खोऱ्यात क्रिकेट खेळताना एवढ्या कमी वयाच्या खेळाडूचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. काही क्षणांपूर्वी मैदानावर जोशात खेळणारा खेळाडू अचानक कायमचा निघून जाईल, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. सुहैलच्या निधनामुळे त्याचे कुटुंबीय, मित्र, सहकारी खेळाडू तसेच भलेसा प्रीमियर लीगशी संबंधित सर्वजण शोकाकुल झाले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा स्पर्धांमध्ये प्राथमिक उपचार, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांसारख्या सुविधा अनिवार्य असाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास काही जीव वाचवता येऊ शकतात, असे मतही व्यक्त होत आहे.
तरुणांमधील वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे चिंता
अलीकडच्या काळात कमी वयातील व्यक्तींमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. खेळताना किंवा व्यायामादरम्यान अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.
