पाताळगंगात वाहून गेलेले सिलेंडर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर?

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला. रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील पाताळगंगा नदीतून गॅस सिलेंडर वाहत गेल्याचे समोर आले होते. आले. शेकडोंच्या संख्येने हे सिलेंडर धरमतर खाडीच्या दिशेने वेगाने जाताना दिसत होते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत वसईच्या समुद्रातही एक सिलेंडर सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा सिलेंडर पाताळगंगा नदीतून वाहत वसईच्या समुद्रात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र काय आहे या दाव्यामागील सत्य जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Unexplored_vasai या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती भरलेला सिलेंडर समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे. तसंच, या व्यक्तीने तो सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. मात्र, पाताळगंगा नदीतून वाहत आलेले सिलेंडर वसईच्या समुद्रकिनारी वाहत आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप या व्हिडिओची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

रविवारी वसई पश्चिमेला असलेल्या भुईगाव समुद्रकिनारी लिस्बन फेरारो यांना समुद्रात एक सिलेंडर तरंगताना दिसून आला. त्यांनी तो सिलेंडर उचलून समुद्रकिनारी आणला. तेव्हा तो भरलेला असल्याचे लक्षात आहे. त्यानंतर त्यांनी समुद्रकिनारी सापडलेला सिलेंडर पोलिसांच्या स्वाधीन केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लिस्बन फेरारो यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एक एलपीजी गॅस सिलेंडर पावसाच्या पाण्यातून वाहत आला. रायगड जिल्हा ते वसई असे तब्बल 130 किमीपर्यंत हा सिलेंडर वाहत आला आहे. यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा जोर किती असेल, विचार करा, असं व्हिडिओत म्हटलं आहे. तसंच, त्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL)ला टॅग करत मला तुमचा एक सिलेंडर सापडला असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, रायगडच्या पाताळगंगा नदीतून वाहत गेलेल्या सिलेंडरपैकीच हा एक आहे की मागील आठवड्यात वसई-विरारमध्ये झालेल्या पावसामुळं एखाद्या घरातून हा सिलेंडर वाहत आलाय का? याची पुष्टी अद्याप झाली नाहीये. मात्र अनेक नेटकऱ्यांनी हा सिलेंडर रायगडच्या पातळगंगातूनच वाहत आल्याचे म्हटलं आहे. तसंच, एचपीचा आहे म्हणजे रायगडचाच असेल, असंही एकाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *