चेंबूर स्कूल बस दुर्घटनाः 11 वर्षांच्या विहानने जीव गमावला, पण दोषी कोणीच नाही; 7 लाखांत सुटला कंत्राटदार

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळल्याप्रकरणी उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आल्याचे समोर येतेय. तसंच, कंत्राटदाराला जबाबदार धरत कंपनीला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी क्लीन चिट देण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिकेने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या अहवालातून दुर्घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच, या अहवालात समितीने उद्यान विभाग व रस्ते विभाग यांना निर्दोषत्व देण्यात आले आहे.

झाडांची सुरक्षितता आणि रस्त्यांच्या देखरेखीसाठी नेमलेल्या कंत्राटदारास अनुक्रमे ५ लाख व २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. याप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

समितीचे म्हणणे काय ?

महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वेळोवेळी संबंधित परिसराची पाहणी केली. झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी केली. तसेच, चेंबूर येथील संबंधित झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान काम सुरू होते. या कामांबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला कळविले होते. त्यामुळे या दुर्घटनेत उद्यान विभागाचा सकृतदर्शनी दोष दिसून येत नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.

झाडालगत पर्जन्यजलवाहिनीचे काम करताना ते झाड पर्जन्यजलवाहिनीत अडथळा ठरत होते. त्यामुळे तेथे पाणी तुंबण्याची शक्यता होती. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी, पर्जन्यजलवाहिनीची सातत्यता ठेवण्यासाठी आणि झाड वाचविण्यासाठी झाडाचा परिघ सोडून रस्ते विभागाने सुरक्षित अंतर ठेवून पर्जन्यजलवाहिनीचे बांधकाम केले. त्यामुळे याप्रकरणी रस्ते विभागाचाही कोणताही दोष दिसून येत नाही, असे चौकशी समितीने स्पष्ट केले.

झाडांची सुरक्षितता, दुर्घटना टाळण्यासाठी नव्या SOP चे आदेश
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यापूर्वी झाडांचे ‘ट्री रिस्क असेसमेंट’, रस्त्यालगतच्या सर्व झाडांची GIS आधारित नोंद, झाडांच्या मुळांचे वैज्ञानिक संरक्षण, अति काँक्रीटीकरण टाळणे, प्रशिक्षित तज्ज्ञांकडूनच झाडांची छाटणी, सहामाही सुरक्षा लेखापरीक्षण, तसेच झाडांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र SOP तयार करण्यासह विविध उपाययोजना समितीने सुचवल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

चेंबूर पश्चिम परिसरात शाळेच्या बसवर 30 जून रोजी दुपारी भलेमोठे पिंपळाचे झाड उन्मळून पडले होते. या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. तर 10 मुले गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपआयुक्त पुरुषोत्तम माळवदे व उपायुक्त शशांक भोरे यांची समिती गठित केली होती. समितीने उद्यानविद्या व लॅण्डस्केप सल्लागार रॉबर्ट फर्नांडिस यांच्यासोबत 3 जुलै रोजी घटनास्थळाची संयुक्त पाहणी करुन सविस्तर अहवाल तयार केला होता.

‘चोरांना मनसे धडा शिकवणार’

चेंबूर दुर्घटने प्रकरणी आलेला अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकीशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल. अश्याच चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *