ज्येष्ठ समाजसेवक आणि एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोएंका यांचं 13 जुलै 2026 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. दिवंगत नंदकिशोर गोएंका हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते तसेच त्यांचे जीवन दृढ मूल्ये, नम्रता, करुणा आणि समाजसेवेप्रती असलेल्या अटळ निष्ठेने घडले होते. मुंबईतील वसंत सागर इथे नंदकिशोर गोयंका यांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्व स्थरातून हळहळ व्यक्त केली जात असून अनेक दिग्गजांनी सोमवारपासून नंदकिशोर गोयंका यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.
गोयंका कुटुंबाच्या माहितीनुसार ज्यांना दिवंगत नंदकिशोर गोएंका यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांनी 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ‘वसंत सागर’, ए रोड, चर्चगेट, मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊ शकतात. दिवंगत नंदकिशोर गोएंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 15 जुलै 2026 रोजी मूळगावी अग्रोहा (हिसार) येथील ‘गोएंका उद्यान’ येथे करण्यात येणार आहेत.
डॉ सुभाष चंद्रा यांची पोस्ट :
एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ सुभाष चंद्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून म्हटले की, ‘आज सकाळी आमचे प्रिय वडील नंदकिशोर गोएंका यांचे निधन झाले. कुटुंबातील सर्वजण दुःखात असले, तरी मला त्यांच्या 96 वर्षांच्या आयुष्याचा गौरवपूर्ण उत्सव साजरा करावासा वाटतो; हे आयुष्य समाजसेवा, गोसेवा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून केलेल्या राष्ट्रसेवेने परिपूर्ण होते.
दिवंगत नंदकिशोर गोएंका जी यांच्या जीवनाचा आणि मूल्यांचा कायमस्वरूपी प्रभाव लक्षात घेऊन आणि त्यातून प्रेरणा घेत, संपूर्ण एस्सेल (Essel) समूह त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी भावना समूह आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
अनेक मान्यवरांनी दिली श्रद्धांजली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नंदकिशोर गोएंका यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोरजी गोएंका यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. ते सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते.
एक समर्पित स्वयंसेवक म्हणून ते सदैव गोसेवेसाठी कटिबद्ध राहिले. व्यवसायापासून दूर राहून त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. ते अग्रवाल समाजाच्या सेवेत नेहमीच सक्रिय होते. त्यांनी अग्रोहाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्या परिवारासोबत आहोत’.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा नंद किशोर गोएंका यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटले की, ‘एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोएंका यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. दुःखाच्या या कठीण प्रसंगी मी गोएंका कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवाराप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’.
