‘आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात साडेपाच हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले, ‘गेल्या वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने पाच हजार १४५ विशेष बस चालवून २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
ग्रुप बुकिंगची सुविधा
राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बससेवेतही सरकारच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
