कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर

गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वे आणि एसटी गाड्यांचे आरक्षण या आठवड्यात सुरू होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवार, १४ सप्टेंबरला आहे. चतुर्थीआधीच्या शनिवार-रविवारी प्रवासाला सर्वाधिक पसंती असते. शनिवार १२ सप्टेंबरचे आरक्षण १४ जुलैला, शुक्रवार ११ सप्टेंबरचे आरक्षण १३ जुलैला सुरू होणार आहे. त्याकडे कोकणवासींचे लक्ष लागले आहे. तर एसटीच्या विशेष बसगाड्यांचे आरक्षण परळ येथे सुरू झाले आहे.

कसं असेल वेळापत्रक?

भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे, प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी आरक्षण सुरू होते. यानुसार, ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १३ जुलैला, १२ सप्टेंबरसाठी १४ जुलैला, १३ सप्टेंबरसाठी १५ जुलैला आणि गणेश चतुर्थी अर्थात १४ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १६ जुलैला आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणरायाच्या तयारीसाठी कोकणात जाताना ‘कन्फर्म’ आसनासाठी प्रवाशांना तयारी करावी लागणार आहे. ‘मध्यरात्रीनंतर सुटणाऱ्या गाड्यांसाठी पुढील दिवसाच्या तारखेचे आरक्षण करावे. गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या आणि त्यांचे आरक्षण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे,’ असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एसटी महामंडळाकडूनही बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागातील परळ आगाराने जादा बस गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १२ जुलै रोजी १० सप्टेंबर, १३ जुलै रोजी ११ सप्टेंबर, १४ जुलै रोजी १२ सप्टेंबर आणि १५ जुलै रोजी १३ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या जादा बसचे आरक्षण सुरू होणार आहे.

महिलांना सवलत

प्रवाशांना जादा बसगाड्यांचे आरक्षण ऑनलाइन, बस स्थानके, आगार कार्यालये तसेच प्रवासी सहाय्यता केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत लागू राहणार आहे. गणेशभक्तांसह प्रवाशांच्या सोईसाठी महामंडळाने यापूर्वीच नियोजन केले आहे. शेकडो बसगाड्या गणेशभक्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरूपातील आरक्षणाचा सहभाग आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार मध्य रेल्वेनं त्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दररोज, सकाळी ८.०० वाजता आयआरसीटीसीच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा संकेतस्थळावर बुकिंग सुरू होईल. तसचं, रेल्वे स्थानकांवरील तिकीट काउंटरवरही बुकिंग सुरू असणार आहे.

आसनगाव-वासिंद दरम्यान लोकल खोळंबा

मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि वासिंद स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दुपारी मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेससह लोकल गाड्या खोळंबल्या. यामुळे प्रवाशांनी रुळांवर उतरून चालत जाण्याचा पर्याय निवडला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करत जवळपास अर्ध्या तासानंतर बंद इंजिन मार्गातून हटवले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र प्रवाशांचे हाल झाले. रविवार दुपारची वेळ असल्याने, सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावत असल्याने सेवेवर फार परिणाम झाला नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *