पंढरपूर वारीत ट्रकची धडक, जेजुरीत तीन महिला वारकऱ्यांचा करुण अंत; तापाच्या गोळ्यांनी चालकाला ग्लानी आल्याची माहिती

श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी

बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

तापाच्या गोळ्यांनी ग्लानी आल्याची माहिती

दरम्यान, ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ग्लानी आली, अशी माहिती मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली नांदेडची असून मयत महिला वारकरी सांगलीच्या रहिवाशी होत्या.

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीच्या ट्रकला अपघात झाला. अपघातग्रस्तांमध्ये सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे,
नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या आहेत

रोहित पवार यांचे ट्वीट

“दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले असून ते लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करुन पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती!” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच जखमींची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली आहे. आता त्या गंभीर जखमी असलेल्या महिलांना भेटण्यासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात जाणार आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालक, वाहनाचा वेग आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *