११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले!

शाळेत जाण्याच्या व खेळण्या-बागडण्याच्या वयात एका अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मिरा-भाईंदरमध्ये घडला आहे. पीडित मुलगी सहा महिने गर्भवती राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार नुकताच उघड झाला आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलगी ही तिचे आई व दोन भावांसोबत भाईंदर पश्चिम परिसरात राहायला आहे. तिची आई मजुरी तर दोन भाऊ कामानिमित्त दररोज घराबाहेर जातात. ती शाळेत जाते आणि त्यानंतर एकटीच घरी असते. याचा गैरफायदा घेत, जवळच राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने पीडितेसोबत प्रथम ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत ऑगस्ट महिन्यात प्रथम पीडितेला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार त्याच्याकडून हे कृत्य सुरू होते. यानंतर काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने पीडितेची आई मुलीला जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेली होती.

यावेळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना लहानगी गर्भवती असल्यासारखे वाटले. मात्र त्यावर विश्वास बसत नसल्याने त्यांनी तिची सोनोग्राफी करण्यास सांगितले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर पीडित मुलगी ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेच्या आईने पीडितेकडे चौकशी केल्यानंतर तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली होती. त्यावरून त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची माहिती घेतली असता तो दोन महिन्यांपूर्वीच तो परदेशात गेला असल्याचे कळाले. या आरोपीला पुन्हा भारतात घेऊन येत त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *