कनेक्टिंग लिंक प्रकल्पाला पावसाचा दणका! आता ‘मिसिंग लिंक’ची सुरक्षा तपासणी होणार, IIT मुंबई करणार ऑडिट

राज्यभरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा थेट फटका राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कनेक्टिंग लिंक प्रकल्पाला बसला आहे. रविवारी रात्री या लिंकच्या जवळ दरड कोसळल्याची घटना समोर आली. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयआयटी मुंबईतर्फे या लिंकच्या कामांचे सुरक्षा परीक्षण केले जाणार असून पाऊस थांबल्यानंतर त्यास सुरुवात होईल. सद्यस्थितीत या लिंकला कोणत्याही प्रकारे धोका नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला

मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या खंडाळा घाटाजवळील मुख्य बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर महामार्गावीरल वाहतूक ठप्प झाली असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. या सर्व घडामोडींनंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी दुपारी या महामार्गावर भेट देऊन या कामांची पाहणी केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे नव्याने पाण्याचा झरा आढळून आला असून त्याचा अभ्यास करण्याचे काम विभागाकडून सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांकडूनही पाहणी पूर्ण

ज्या सरंक्षक भिंतीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली, त्या ठिकाणाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पाहणी पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सरंक्षक भिंतीजवळ एक मोठी दरड कोसळल्याने त्याचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याशिवाय या महामार्गावरील वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.

शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भोसले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना या संदर्भात सुरक्षा परीक्षण करण्याची सूचना केली. सुरक्षा ऑडिटची ही संपूर्ण जबाबदारी आयआयटी मुंबईला देण्यात आली आहे. ‘मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे डोंगराच्या माथ्यावर नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे अचूक निरीक्षण करणे शक्य होत नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येईल’, असे भोसले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *