‘गायमुख – कासारवडवली – वडाळा’ या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’ या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पातील महत्वपूर्ण स्थानक असणाऱ्या गायमुख मेट्रो स्थानकाचे पत्रे सोमवारी निखळले. सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका या स्थानकाच्या पत्र्यांना बसला. अद्याप या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झालेली नसताना अशी दुर्घटना घडल्याने या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या ‘गायमुख-कासारवडवली-वडाळा’ या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’च्या गाड्यांच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गायमुख स्थानकात दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत या मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील मेट्रो कामाच्या कासवगतीचा मुद्दा समोर आला.
वर्ष उलटूनही या मार्गावरील मेट्रोसेवा सुरू झालेली नसताना सोमवारी या स्थानकावरील पत्रे निखळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. सुदैवाने या प्रकारात कोणालाही इजा झाली नाही. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सर्वच स्थानकांमधील पत्रे आणि इतर साहित्यबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक सुरज सिंग यांनी केली.
ठाण्यात वृक्षपडझडीची ‘शंभरी’
धुवाँधार पाऊस, सोसाट्याचा वारा, काँक्रीटचा फास आणि अशास्त्रीय छाटणीमुळे ठाण्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११० वृक्ष उन्मळून पडले. यासोबतच ३८ फांद्याही कोसळल्या. या पडझडीदरम्यान १४ झाडे व ६ फांद्या धोकादायक अवस्थेत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या. यावेळी रस्त्यावर उभ्या पांडुरंग भुवड या पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच कोसळलेल्या वृक्षांची छाटणी करताना रेस्क्यू टीमचे फायरमॅन अंकित यादव यांना गंभीर दुखापत झाली.
जखमींवर रुग्णालयात उपचार
लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरून चालत जाणाऱ्या पांडुरंग भुवड यांच्यावर झाड कोसळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि मीनल संख्ये घटनास्थळी दाखल झाले. रेपाळे यांनी भुवड यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, श्रीरंग सोसायटी येथील वृंदावन बस थांब्याशेजारी धोकादायक स्थितीतील झाड कापताना रेस्क्यू फायरमॅन अंकित यादव (३२) यांच्या पायाला कटर मशिन लागून दुखापत झाली. त्यांना ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
