मलबार हिल आणि ट्रॉम्बे येथे रविवारी हत्येच्या दोन घटना घडल्या. नेपियन्सी रोड भाड्याने राहणाऱ्या तरुणाने शेजारी महिलेची गळा दाबून हत्या केली. तर चिता कॅम्प येथे मंदिरातील आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणाला पेव्हर ब्लॉकने मारले.
नेपियन सी रोड येथील शिमला नगर वस्तीत राहणाऱ्या ज्योती पवार (५५) या महिलेची बॉडी राहत्या घरी शनिवारी मलबार हिल पोलिसांना आढळली. शवविच्छेदनामध्ये ज्योती यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
आई फोन उचलत नसल्याने चिंता
घरकाम करणाऱ्या ज्योती पवार यांना त्यांचे कुटुंबीय वारंवार फोन करत होते मात्र शनिवारी कॉल्सना प्रतिसाद न दिल्याने दहिसर येथे राहणारी त्यांची कन्या एकता जाधव यांना चिंता वाटू लागली. कारण त्यांच्या आईची दिनचर्या निश्चित होती आणि त्या फोनला प्रतिसाद देत नव्हत्या.
नातेवाईक पवारांच्या निवासस्थानी पोहोचले असता त्यांना खोली आतून बंद असल्याचे आढळले. आत प्रवेश केल्यावर, ज्योती त्यांना मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मानेवर जखमेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. या घटनेची माहिती मलबार हिल पोलिसांना देण्यात आली
तपास अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, शेजाऱ्यांकडे चौकशी केली आणि गुन्ह्याच्या सुमारास चाळीत आलेल्या व्यक्तींची पडताळणी केली. तपासादरम्यान, मोहम्मद कैफ याच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यांनी त्याला या गुन्ह्याशी जोडणारे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले.
सोन्याची चेन चोरुन पसार
पोलीस तपासादरम्यान त्यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या मोहम्मद खैफ शेख (२३) याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पवारांची सोन्याची चेन लंपास करुन तो पळाला. हत्येनंतर शहराबाहेर पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेख यास पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याने सांगितले की, त्याला अलिकडेच त्याच्या छोट्या व्यवसायात नुकसान झाले होते आणि तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता. पवार गळ्यात सोन्याची चेन घालतात हे त्याला ठाऊक होते. काही कारण काढून तो पवारांच्या घरात शिरला. त्यांचा गळा दाबून जीव घेतला आणि सोन्याची चेन खेचून परागंदा झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे उपआयुक्त आर. रागसुधा यांनी सांगितले.
