मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

लोणावळ्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मळवली परिसराला समुद्राचं स्वरुप प्राप्त झालं असून इथल्या घरे आणि बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने हाहाःकार उडाला आहे. लोणावळ्यात आतापर्यंत इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६२५ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. हा देशातील एक रेकॉर्ड मानला जात आहे. २४.६१ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे

मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली आहे, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावरच स्लॅब पडला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असून जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेल्याने मुंबई आणि पुणे यांना जोडणारे चारही मार्ग ठप्प झाल्याचे चित्र आहे.

बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

मावळमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात, बंगल्यात पाणी घुसल्याने संसार पाण्यात गेले आहेत. हजारो लोक ठिकठिकाणी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. मळवली परिसराला समुद्राचे स्वरुप प्राप्त झाले असून, येथील घरे व बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले आहे.

लोणावळा परिसराला पुराचा धोका

मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. दरडीत अडकलेल्या रहिवाशांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. लोणावळ्यातील टाटाचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लोणावळा शहर व परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

विक्रमी पावसाची नोंद

लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी मध्यरात्रीपासून विविध ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी व संपूर्ण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे . पवना धरण पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासात विक्रमी ३७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे असून, मागील १२ तासांत १३ टक्के पाण्याची पातळी वाढली आहे.

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना

सर्व भाविक, वारकरी व नागरिकांना कळवण्यात येते की, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. कृपया बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे.
– माधव खांडेकर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद, आळंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *