कोकणात पावसाने दाणादाण; कशेडी घाटात भलीमोठी दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प, प्रशासनाकडून महत्त्वाचं आवाहन

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड पोलादपूर दरम्यान असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळल्याची घटना घडलीय. हॉटेल अनुसयाजवळ नव्या महामार्गावर मोठी दरड पहाटे चारच्या सुमारास कोसळल्यानं पहाटेपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साह्याने युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलं आहे. गटारासरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि खेड येथील रेस्क्यू टीम मदत पथक मदतीसाठी दाखल झालं आहे.

नव्या महामार्गावर दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्यानं महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. महामार्ग सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळताच महामार्ग पोलीस प्रशासन, खेड पोलीस, महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी समन्वय साधून तातडीने पहाटेच्या सुमारासच घटनास्थळी धाव घेऊन मदतीसाठी जेसीबी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे. घटनास्थळी खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे नव्या एक्सप्रेस महामार्गावरील दरड कोसळल्यानं या महामार्गावरील वाहतूकही पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. तर कोकणातील रायगड जिल्हा व पुण्याला जोडणाऱ्या माणगावजवळील ताम्हिणी घाटात दोन दरडी कोसळल्या आहेत. तर पुणे हद्दीत रस्ता खचला आहे. दोनठिकाणी झाड पडली आहेत. खेड तालुक्याचे पोलीस अधीक्षक अहिरे यांच्यासह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मदत पथके आदी घटनास्थळी सकाळपासून दाखल झाले आहेत.

काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास पाणी वाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *