अंबरनाथ नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नालेसफाईच्या कामांदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना पाटील यांनी, ‘थोडाफार भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे’ असे विधान केल्याने सभागृहातील सदस्यही काही काळ अवाक् झाले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले सदाशिव पाटील यांनी आपल्या चार नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला देत उपनगराध्यक्षपद मिळवले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांनुसार शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने नगरपरिषदेत प्रभावी विरोधी पक्ष उरलेला नाही. युतीनंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने विषयपत्रिका सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आली होती.
सभेसमोर तब्बल ३३६ विषय ठेवण्यात आले होते. विरोधी पक्ष नसतानाही काही विषयांवर शिवसेना-भाजपच्या सदस्यांमध्ये मतभेद दिसून आले. नालेसफाईच्या कामांवरील चर्चेदरम्यान भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पाटील यांनी हे विधान केल्याने एकच खळबळ उडाली. उपनगराध्यक्ष पाटील हे चुकीचे विधान करत असल्याचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी त्यांना लक्षात आणून देत अप्रत्यक्ष समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही पाटील यांनी सभागृहात उपस्थित एका अभियंत्यांकडे पाहत, ‘भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे’ या वक्तव्याचा पुरुच्चार केला. त्यांच्या वक्तव्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, सदाशिव पाटील यांचे हे पहिलेच वादग्रस्त प्रकरण नाही. यापूर्वी अंबरनाथ पूर्वेतील बि कॅबिन मार्गावरील पालिकेच्या अर्धवट आणि कच्च्या पुलावरून वाहने चालवून त्या पुलाचे उद्घाटन केल्यामुळे पाटील यांच्यावर टीका झाली होती.
