मुंबईत पावसाचा धुमाकूळ; लोकल वाहतूक विस्कळीत, दुपारनंतर आणखी गंभीर स्थिती, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचं आवाहन

मुंबई शहर आणि परिसरात मागील काही तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. अशातच काही वेळापूर्वी कांजूरमार्ग आणि भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला प्लास्टिक अडकल्यामुळे या दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायरवरील प्लास्टिक हटवण्याचं काम सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची स्थिती पाहता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच शासकीय आणि निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई शहरासह परिसरात कोसळत असल्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. “राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे. दुपारी यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सगळ्यांनी पूर्णतः प्रवास आणि घराबाहेर पडण्याचे टाळावं,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

महापालिकेनेही दिल्या सूचना

हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केलं आहे. “अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहन पालिकेने केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *