आषाढी एकादशीनिमित्त सबंध वैष्णवांचा मेळा पंढरपुरच्या दिशेनं निघाला असतानाच आळंदीमध्येही हा उत्साह शिगेला पोहोचला. संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा 8 जुलै रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी आळंदीत पावसाचा जोर वाढल्यामुळं यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहेत.
इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांनी आहे तिथेच थांबावं आळंदीकडे येऊ नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केलं आहे. इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने वारकऱ्यांनी आळंदी कडे येण्याचं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुराची स्थिती पाहता आळंदी देवस्थानसह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनानं इथं योग्य ती काळजी घेतली आहे. मात्र तरीसुद्धा आहात तिथं सुरक्षित राहत यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
आळंदीत इंद्रायणी नदी पाणी पातळीत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन आळंदी मधील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करत नदीपात्रात कोणीही उतरू नये असं आवाहन नगरपरिषदेनं केलं. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सिद्धपेठ परिसरातील विविध धर्मशाळांमध्ये 250 हून अधिक नागरिक अडकले. ज्यांना अग्निशमन दल, पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम राबवण्यात आली होती.
आळंदीत इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळं नागरिकांनी आणि तिथं हजर असणाऱ्या वारकऱ्यांनी नदीकाठ, नदीपात्र किंवा पुलाच्या परिसरात जाणं टाळावं असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असाही इशारा देण्यात आला आहे.
आळंदीत इंद्रायणीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिर परिसरात असणाऱ्या शनी मंदिर क्षेत्रातील प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानांमध्येही पुराचं पाणी शिरलं आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी मंदिर जोडणारा पूलसुद्धा पाण्याखाली असून, देहू फाटा ते चाकण रस्ता जोडणारा गरुड स्तंभाजवळचा पूलसुद्धा पाण्याखाली गेल्यानं इथं पावसानं तारांबळ हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे.
