आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील दोन प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेवरून सिन्नर बाह्यवळण ते गुरेवाडी फाटा तसेच संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी या मार्गांच्या काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला.
दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांचाही समावेश
सिन्नर आणि मुसळगाव एमआयडीसीतील विस्तारामुळे या मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. पुणे, नाशिक आणि शिर्डीकडून होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक, वाढती वाहनसंख्या आणि अपुरे रस्ते यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या मार्गांच्या चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० आणि १६० मधील १३.८० किलोमीटरचा भाग राज्यमार्ग २७ (अ) आणि २७ (ब) म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार सिन्नर बाह्यवळण ते गुरेवाडी फाटा या ८.५ किलोमीटर आणि संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी या ५.३ किलोमीटर मार्गांचे काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांचाही समावेश करण्यात आला आहे.
सध्या या मार्गांपैकी सुमारे ५.१० किलोमीटर भागाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी उर्वरित ८.७० किलोमीटर रस्ता दोन पदरी असल्याने वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कुंभमेळ्याच्या काळात वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. या प्रकल्पासाठी रस्त्यांच्या कामांवर २४० कोटी रुपये, पूल व इतर संरचनांवर २० कोटी रुपये तसेच इतर पूरक कामांसाठी ४० कोटी रुपये असा एकूण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आमदार तथा माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अविनाश देवरे यांनी तो कुंभमेळा आयुक्तांकडे सादर केला आहे.
