सरकते जिने गर्दीच्या वेळी बंद, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही

सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे जिने अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना पायऱ्यांवरूनच पादचारी पुलावर चढावे लागत असून ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

तक्रार केल्याशिवाय दुरुस्त होत नाहीत

डोंबिवली हे अत्यंत गर्दीचे स्थानक असून येथे क्रमांक ५च्या फलाटावर केवळ उतरणारा सरकता जिना बसविण्यात आला आहे. त्यामुळे या फलाटावर उतरलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या फलाटांवरील सरकते जिने गर्दीच्या वेळीच बंद राहतात, अशीही तक्रारआहे. तसेच, हे जिने बंद पडल्यानंतर प्रवासी किंवा प्रवासी संघटनांकडून तक्रार केल्याशिवाय दुरुस्ती होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पावसाळ्यात पूर्वेकडील परिसर पाण्याखाली जात असल्याने सरकते जिने आणि लिफ्टही बंद पडतात. परिणामी, पावसाळ्यात प्रवाशांना या सुविधांशिवायच ये-जा करावी लागते.

कल्याण स्थानकात पश्चिमेकडील बाजूस असलेले सरकते जिने मध्यवर्ती पुलासाठी असले तरी त्यांची रचना सोयीची नसल्याने गर्दीच्या वेळी या जिन्यांचा उपयोग मर्यादित ठरतो. अनेकदा हे जिने बंदच असतात. तसेच आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांवरील जिनेही एकदा बंद पडल्यावर पुन्हा सुरू होण्यासाठी विलंब होतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे. यामुळे सरकत्या जिने शोभेसाठी बसवली आहेत का, असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

अनवधानाने बंद

दरम्यान, सरकत्या जिन्यांच्या स्लायडिंगजवळ असलेले बटण अनवधानाने प्रवाशांच्या स्पर्शाने बंद होते. त्यामुळे जिने आपोआप थांबतात. ते पुन्हा सुरू करण्यास सुमारे अर्धा तास लागतो. दिवसभरात अशा प्रकारे चार ते पाच वेळा जिने बंद होतात, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिवसाची सुरुवात रेल्वे बिघाडाने

सकाळी लवकर आपापल्या कार्यालयांत पोहोचण्याच्या गडबडीत असलेल्या मुंबईकरांच्या शुक्रवारची सुरुवातच बिघाडाने झाली. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात रुळाला तडा गेल्याने रेल्वे खोळंबली. तर पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर आणि पॉइंटबिघाडामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. दोन्ही मार्गांवर सकाळीच झालेल्या बिघाडामुळे लोकल फेऱ्या सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. विशेष म्हणजे, याबाबत कोणतीही उद्घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत नसल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते दादर दरम्यान सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल फेऱ्या विस्कळीत झाल्या. सकाळी गर्दीच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी प्रवासी रेल्वे फलाटावर दाखल होत होते. मात्र अर्धा-पाऊण तास लोकलच येत नसल्याने प्रवाशांनी समाजमाध्यमांवर रोष व्यक्त केला. रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने काम सुरू केल्यानंतर, सुमारे दीड तासाने काम पूर्ण झाले. साडेसात वाजण्याच्या सुमारास लोकल वाहतूक सुरू झाली. मात्र सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चर्चगेटमधील रुळांच्या पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा लोकलच्या एकामागोमाग एक लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे रेल्वेच्या कारभारासह देखभालीवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *