नुकतंच राज्यातील एक बेधडक पोलीस अधिकारी अशी ओळख असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांनी राजकीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जिथं त्यांनी व्यासपीठावर केलेल्या भाषणातून संघाबाबतचे आपले विचार मांडले. मात्र, त्यांचे हे विचार आणि एका हिंदू संम्मेलनात उपस्थित राहून त्यांनी केलेली वक्तव्य एका नागरी सेवेतील अधिकाऱ्याकडून येणं राज ठाकरेंना मात्र पटलं नाही. ज्या कारणास्तव एका लांबलचक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी बोचऱ्या शब्दांत व्यक्त केली.
‘आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत. आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !’
भान राहिलं नाही का?
नांगरे पाटील यांनी संघाचं कौतुक केलं असलं तरीही आपण एक पोलीस अधिकारी असून, त्यांच्याकडून निष्पक्षतेची अपेक्षा असते, याचं भान राहिलं नाही का? असाही सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. ‘तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल’, असं स्पष्टपणे सांगत त्यांनी नांगरे पाटील यांना ‘सल्ला’ दिला. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता, मात्र तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच लक्षात आल्याचं म्हणत त्यांनी टोलाही लगावला.
सक्तीच्या रजेचा संदर्भ काय?
राज ठाकरे यांनी 2012 मधील एका प्रसंगाची मांडणी या पोस्टमध्ये करत सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘2012 ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ? असा कळकळीचा प्रश्न उपस्थित तरत ‘नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !’ असं अगदी ठामपणे सांगितलं.
