मोदी मंत्रिमंडळ फेरबदलात ‘टायगर’ची डरकाळी, शिवसेनेचं ‘वजन’ वाढणार, श्रीकांत शिंदे-ओमराजेंच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रात यशस्वी झालेल्या ‘ ऑपरेशन टायगर ‘च्या दुसऱ्या पर्वाचे पडसाद केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात पाहायला मिळू शकतात. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे एनडीएची ताकद वाढली आहे. शिंदेंचे खासदार सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची मोदी कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नावही संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहे.

राष्ट्रवादीलाही एका मंत्रिपदाची अपेक्षा

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही एका मंत्र्याचा समावेश केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला तेव्हा प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आले होते, परंतु त्यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हे पद देऊ केल्यामुळे चर्चा थांबली होती. आता फेरबदल होताना प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे ही दोन नावं चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पंतप्रधान मोदी २८ किंवा २९ जून रोजी मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार करु शकतात, अशी चर्चा आहे.

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील विद्यमान मंत्री कोण?

नितिन गडकरी (भाजप): नागपूर लोकसभा – कॅबिनेट मंत्री
पीयूष गोयल (भाजप): उत्तर मुंबई लोकसभा – कॅबिनेट मंत्री
रक्षा खडसे (भाजप): रावेर लोकसभा – राज्य मंत्री
मुरलीधर मोहोळ (भाजप): पुणे लोकसभा – राज्य मंत्री
प्रतापराव जाधव (शिवसेना): बुलढाणा लोकसभा – राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
रामदास अठावले (रिपाइं): राज्यसभा खासदार – राज्य मंत्री

नागपूर येथील रा स्व संघाच्या मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरबदलांनंतर मंत्र्यांचे सरासरी वय कमी होईल. मोदींचे नवीन मंत्रिमंडळ अधिक तरुण असेल; परिणामी तरुण खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता अधिक आहे. बालाजीचे दर्शन घेताना ११ किमी पायपीट करणाऱ्या श्रीकांत शिंदे, ओमराजेंची याच कारणाने वर्णी लागण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *