अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्यानंतर आता पायी मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक व भाविकांसाठी दीर्घकाळ दुरवस्थेत असलेल्या पायऱ्यांचाही राज्य पर्यटन विभागाकडून विकास केला जात आहे. तीन टप्प्यांत जवळपास पाच कोटी रुपयांच्या निधीतून मलंगगडावर जाणाऱ्या मार्गावरील सुमारे साडेतीन हजार पायऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच उर्वरित पायऱ्यांचे बांधकामही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू
अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या निसर्गसंपन्न श्री मलंगगडावर दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना प्रवासातील गैरसोयींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून खडतर मार्गाने जावे लागत होते. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर काही महिन्यांपूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. मलंगगडवाडी ते गडापर्यंत जाणाऱ्या सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांचीही अनेक वर्षांपासून दुरवस्था होती. त्यामळे या मार्गावर व्यवसाय करणारे स्थानिक, साहित्य विक्रेते आणि पायी प्रवास करणारे भाविक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकाराने या पायऱ्यांच्या पुनर्बाधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी तीन टप्प्यांत सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती सार्वजनिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिली. येत्या काही महिन्यांत दगडी पायऱ्यांचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, विशेषतः पावसाळ्यातही, स्थानिक आणि भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
कामात अडथळे
फ्युनिक्युलर ट्रॉली ते दर्या दरम्यानच्या मार्गाची दुरवस्था आणि अस्वच्छतेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने यापूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या मार्गाच्या विकासासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, काही स्थानिकांच्या विरोधामुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
