बदलापूर येथील विवाहितेची हत्या केल्याप्रकरणी तिचा ४० वर्षीय पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. नाक तोंड दाबून पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न मायलेकाने केला होता. प्राजक्ता मेहेर असे मयत महिलेचे नाव होते.
फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक उलगडा
मंगळवारी बदलापूर पोलिसांना प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालांमधून हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. या अहवालांनुसार प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे झाला होता. हा निष्कर्ष कुटुंबाने केलेल्या ‘नैसर्गिक मृत्यू’च्या दाव्याच्या अगदी उलट होता. या निष्कर्षाच्या आधारे, पोलिसांनी प्राजक्ता यांचा पती योगेश आणि सासू अरुणा यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
घटस्फोटासाठी दबाव
प्राजक्ता आणि योगेश यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांना १५ आणि ११ वर्ष वयाची दोन मुले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या आरोपानुसार, योगेशचे त्याच्याच गावातील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तो प्राजक्तावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने त्यास नकार दिला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोट मिळवण्यासाठी योगेशने आपल्या सासरच्या मंडळींना पैसेही देऊ केले होते, परंतु त्यांनी ती रक्कम नाकारली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
९ एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ता यांच्या कुटुंबीयांना कळवले की, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. सुरुवातीला उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि बॉडी शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवली. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की, पुढील तपासणीसाठी प्राजक्ताचे ‘व्हिसेरा’ नमुने जतन करून ठेवण्यात आले होते. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले.
प्राजक्ता यांच्या पालकांनी योगेशचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत, तिला तसेच या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर कुटुंबीयांनाही अटक करण्याची मागणी केली आहे.
