मुंबईतील वरळी सी-लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. वरळी सी-लिंकवरुन जात असताना त्याने टॅक्सी चालकाला मळमळ होत असल्याचं सांगत गाडी थांबवण्यास सांगितली. यानंतर त्याने समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
वरळी सी लिंकवरून भावेश मजेडिया नावाच्या व्यक्तीने समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं आहे. भावेश मजेडिया हे एक व्यावसायिक असून ठाण्याचे रहिवासी आहेत. टॅक्सीने जात असताना त्यांनी टॅक्सी चालकाकडे ‘मला जरा मळमळत आहे, टॅक्सी थांबव’ अशी विनंती केली. चालकाने टॅक्सी थांबवताच भावेश मजेडिया यांनी समुद्रात उडी मारली. यानंतर चालकाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
घटना समजताच बचावर पथक घटनास्थळी दाखल झालं. जोराचा वारा असल्याने कर्मचाऱ्यांना शोध घेताना अडथळे येत होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर मृतदेह हाती लागला. नायर रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भावेश मजेडिया (51) यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
