पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. ऐन कार्यालयीन वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दादर ते चर्चगेट या स्थानकांच्या दरम्यान सकाळी ६ ते साडेसात वाजताच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. परिणामी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनंतर विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अंधेरी रेल्वे स्थानकावर काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दादर ते चर्चगेट स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर ८ वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक इथं पॉइंट फेल्युअर झाल्याचे आढळून आले. एकामागोमाग एक असे दोन तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. दोन्ही बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतर बऱ्याच काळ या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
