औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर मागील दोन महिन्यांपासून लागू असलेले सर्व निर्बंध हटवले असून, पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी होणे, होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होणे आणि कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रमार्गे LPG आयात पूर्वपदावर आली असून व्यावसायिक ग्राहकांना सिलेंडर मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्षानंतर पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एप्रिलमध्ये कमर्शियल LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 15 दिवसांचा ‘लॉक-इन’ नियम लागू केला होता. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मेस, पीजी आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना 15 दिवसांच्या आत दुसरा कमर्शियल सिलेंडर बुक करता येत नव्हता. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता हा नियम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, आज देशभरात घरगुती आणि कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ₹942 असून 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरची किंमत ₹3,113.50 आहे.
