काहीशी विश्रांती घेत मुंबई आणि नवी मुंबईह राज्यात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांसह इतरही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. विदर्भसुद्धा या पावसास अपवाद ठरला नाही. आठवड्याच्या अगदी अखेरीस, पुढील 24 तासांमध्ये मोसमी वाऱ्याची दिशा आणखी पुढं सरकणार असून, या वाऱ्यांना मिळालेल्या वेगामुळं राज्याच्या उर्वरित भागांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. पहाटेच्या वेळी आणि दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाचे ढग दाटून येऊन अनेक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, प्रामुख्यानं घाटमाथ्यावर सरींचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर इथं घाटमाथ्यावर दृश्यमानता कमी होईल ज्यामुळं यादरम्यान प्रवास करत असतानाही सतर्कता बाळगण्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.
