नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, लस घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर रस्त्यावर कोसळली

नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर गेले असता एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. श्रावणी अनिल पाटील असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रावणी हिच्या कुटुंबियांनी केला आहे.

नाशिकच्या खुटवड नगर येथे 24 जूनला घटसर्प आणि धनुर्वात याचे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्रावणी ही देखील या ठिकाणी वडिलांसोबत लस घेण्यासाठी आली होती. लस घेतल्यानंतर ती तेथून निघाली आणि काही अंतर जाताच श्रावणी हिला चक्कर आल्याने ती खाली कोसळली. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून मृत्यू झाल्याची घोषणा

श्रावणी पाटील हिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर श्रावणी हिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. मात्र श्रावणीचा मृत्यू हा लसीकरणामुळेच झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

कुटुंबियांचे नेमके आरोप काय?

“श्रावणी हिच्या मृत्यूला एकमेव कारण हे लसीकरणच आहे. ती सकाळी नाश्ता करून घरून लसीकरणासाठी निघाली होती. लसीकरांसाठी महापालिकेचे लोक घरी आले होते. त्यांनी लसीकरणासाठी येऊन जा असे सांगितले होते. त्यांनंतर लस घेण्यासाठी श्रावणी ही महापालिकेकडून आयोजित संकटमोचन हनुमान मंदिर येथील लसीकरण शिबिरात दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान गेली होती. लस घेतल्यानंतर ती जवळ असलेल्या मेडिकल येथे जात असताना काही मिनिटात ती चक्कर येऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला”, असा आरोप मयत श्रावणीच्या घरच्यांनी केला आहे.

शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण येणार समोर

श्रावणी हिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. मात्र लसीकरणानंतर श्रावणी हिच्या मृत्यू झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या घटनेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. संबंधित प्रतिबंधित लस ही एक्सपायरी होती का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. श्रावणीच्या मृत्यूला लसीकरण जबाबदार नसेल तर मग तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणास्तव झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमधील 16 वर्षीय श्रावणी पाटीलच्या मृत्यूच्या प्रकरणात तुम्हाला काय वाटते? या घटनेवर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *