नारेगाव भागात एका घरात एकट्या असलेल्या सुनेचा हात धरून सासऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पती आणि सासूला दिली असताना, त्यांनीही विवाहितेला शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणात विवाहितेचा सासरा शेख शाकीर, पती शेख समीर आणि सासू फुलजानबी या तिघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीत, १५ मार्च रोजी सदर महिला ही घरात एकटी असताना, तिच्या बेडरूमध्ये तिचा सासरा शेख शाकीर हा आला. सासऱ्याने सुनेचा हात धरून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही घटना विवाहितेने तिचा पती शेख समीर व सासू फुलजान बी यांना सांगितले असता, त्यांनी विवाहितेला शिवीगाळ केली. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितले तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
अन्य एका प्रकरणात विवाहितेचा तिच्या सासऱ्याकडील नातेवाईकांनी पैशांसाठी तसेच लग्न चांगले लावून दिले नाही म्हणून छळ केला. तसेच हा छळ सुरू असताना, विवाहितेच्या दिराने तिच्या रूममध्ये येऊन तिचा लज्जा वाटेल असे कृत्य केले. विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि मोबाइल हिसकावून तिच्या मुलीला हिसकावून तिला घरातून हाकलून दिले. ही घटना खोसेपार्क लोहेगाव जि. पुणे येथे घडली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून मुस्तकीन रफिक शेख, दिर नुजहर रफिक शेख सह अन्य दोन महिलांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती, दिराने मारहाण करून केला विनयभंग
गणोरीहून संघर्षनगर येथील विवाहितेच्या घरी पती मनोज जाधव, दीर अमोल जाधव आणि सासरे बाजीराव जाधव यांच्यासह सासू हे आले. पतीने विवाहितेला तू माझा फोन का उचलत नाही? अशी विचारणा करून शिवीगाळ केली. विवाहितेच्या लहान भाऊ व वडिलांनी मध्यस्थी केली असता, दोघांनी त्यांना मारहाण केली. वडिलांना वाचविण्यासाठी विवाहितेने मध्यस्थी केली असता, दीर अमोल जाधव याने विवाहितेचा शर्ट सर्वांसमोर फाडला. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही घटना २२ जून रोजी सायंकाळी संघर्षनगर येथे घडली. या प्रकरणी मनोज जाधव, अमोल जाधव, बाजीराव जाधव व महिलेच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक घोरपडे हे करीत आहेत.
