पावसामुळे दुचाकी शेतात रुतू नये म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न, आईच्या डोळ्यांदेखत लेकराचा वीज कोसळून अंत; शेतातच माऊलीचा आक्रोश

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे शेतात कापूस लागवडीचं काम करत असताना अंगावर अचानक वीज कोसळल्यानं एका तरुण शेतकऱ्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 23 जून रोजी दुपारी घडली. आईच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहापूर गावावर शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हवामानात अचानक बदल अन्…

राकेश रतिलाल पाटील (32, रा. शहापूर, ता. अमळनेर) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. राकेश पाटील हा शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणारा कष्टाळू आणि तरुण शेतकरी होता. कुटुंबाच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी त्याने सांभाळली होती. यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी तो गेल्या काही दिवसांपासून शेतातील कामांमध्ये राबत होता. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी 22 जून रोजी तालुक्यातील चांगला पाऊस झाल्यानं कपाशी लागवडीसाठी जमीन भुसभुशीत आणि पोषक वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याने आपल्या आईसह काही महिला मजुरांना घेऊन शेतात कपाशी लागवडीचं काम सुरू केलं होतं. सकाळपासून वातावरण चांगलं होतं. दुपारच्या सुमारास मात्र अचानक हवामानात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

त्याचवेळी शेतात उभी असलेली दुचाकी शेतातच रुतू नये म्हणूण सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश पाटील याने रस्त्याकडे धाव घेतली. दुचाकी हलविण्यासाठी तो रस्त्याच्या दिशेने जात असताना काही क्षणांतच वीज थेट त्याच्या अंगावर कोसळली. विजेचा जोरदार तडाखा बसल्यानं तो जागीच कोसळलं. ही संपूर्ण घटना त्याच्या आईसह शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांच्या डोळ्यासमोर घडली. मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याचं पाहताच आईने मदतीसाठी आक्रोश केला. तिचा हंबरडा ऐकून परिसरातील शेतकरी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राकेश पाटील याला तात्काळ उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबाचा आधावड हरपला

गावातील सामाजिक उपक्रमांमध्येही त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाने शहापूरसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राकेश पाटील याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *