मुंबई मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुर्वणाला धारधार शस्त्र कुणी दिलं? प्रकरणात डिलिव्हरी बॉय मित्राची एन्ट्री

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा सापळा बनेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. 22 वर्षीय मयंक लोहारची धावत्या ट्रेनमध्ये निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. डब्यात पावसाचं पाणी शिरत असल्यानं दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर ही घटना घडली. त्याच्या मृत्यूने विरारमधील लोहार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात दुःख आणि संतापाची लाट पसरली आहे. मयंक लोहार विरारमधील जीवदानी रोडवरील अमरनाथ बिल्डिंगमध्ये आपल्या आई-वडील, भाऊ आणि लहान बहिणीसोबत राहत होता.

रोशनला त्याच्या मित्राने दिला होता सुरा

चर्चगेट-बोरिवली फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहारची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेत आता आरोपी रोशन सुर्वणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाने घटनेत वापरेला सुरा त्याच्या मित्राकडून घेतला होता. रोशन सुर्वणाचा मित्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा त्याच्या एका ग्राहकाने कंपनीला रिटर्न केला होता. हाच रिटर्न केलेला सुरा मित्राने रोशन सुर्वणाला दिला होता. सुवर्णाने हा सुरा स्वत:च्या बॅगेत लपवून ठेवला होता. त्याच सुऱ्याने रोशन सुर्वणाने निष्पाप मयंक लोहारला संपवलं. दरम्यान, सुवर्णाने स्वत:सोबत सुरा का बाळगला?, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी

मयंकने लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. तो कुटुंबाचा मुख्य आधार होता आणि दररोज कामावर ये-जा करण्यासाठी खडतर प्रवास करत असे. ही घटना मंगळवारी 23 जून रोजी रात्री जोगेश्वरी आणि मालाड दरम्यान घडली. जेव्हा तो नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होता. आता मयंकच्या घरात भयाण शांतता पसरली आहे आणि अश्रूंचा पूर आला आहे.

आईचा मन हेलावलणारा टाहो

ज्या वडिलांनी आपल्या मुलाला मोठ्या कष्टाने वाढवले, ते आता पूर्णपणे खचले आहेत. मयंकचे वडील रमेश लोहार यांनी प्रशासनाकडे कठोर शिक्षेची मागणी केली आहे. आपले अश्रू आवरत त्यांनी मागणी केली की, इतर कोणत्याही मुलावर अशी भीषण दुर्घटना कधीही ओढवू नये. माझ्या निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपीला फाशी देण्यात यावी. मयंकची आईसुद्धा आपल्या मुलाला गमावल्याने पूर्णपणे खचली आहे. ती म्हणाली की, मी माझा कमावता मुलगा गमावला आहे. आमचा आधारच नाहीसा झाला आहे. ती रडतच राहिली. तिच्या हृदयद्रावक किंकाळ्यांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हादरवून सोडले.

बहिणीचे डब्यामधील बघ्यांना सवाल

लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादानंतर एका तरुण प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या घटनेमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या माणुसकी आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मयंकच्या धाकट्या बहिणीने डब्यामधील नागरिकांना प्रश्न विचारला आहे की, ‘जेव्हा माझ्या भावाला वारंवार चाकूने भोसकले जात होते, तेव्हा डब्यातील इतर लोक काय करत होते? त्याला वाचवण्यासाठी एकही प्रवासी पुढे का आला नाही?’ घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, लोकल ट्रेनच्या डब्यात सुमारे 30 प्रवासी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *