राज्यभरात मान्सून दाखल झाला असला, तरी पावसाचा जोर येत्या २ जुलैपर्यंत फारसा नाही असे चित्र मॉडेलवरून दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्यासाठी २ जुलैपर्यंतची वाट पाहावी लागू शकते. ९ ते १६ जुलै या कालावधीत उत्तर कोकणात पावसाचा जोर अधिक असण्याचीही शक्यता आहे.
मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. मात्र, २५ जून ते २ जुलै या आठवड्यात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी सरासरीहून अधिक पाऊस पडू शकेल असा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक असू शकेल. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यासाठी २ जुलैची वाट पाहायला लागेल. मॉडेलवरून वर्तवलेल्या अंदाजानुसार, २ जुलै ते ९ जुलै या कालावधीत कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा परिसर, विदर्भ येथे पावसाचा जोर सरासरीहून अधिक असेल. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी सरासरीहून अधिक पाऊस पडू शकेल. त्यानंतर ९ ते १६ जुलै या कालावधीत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र येथे सरासरीहून पाऊस जास्त असू शकेल. मात्र दोन आठवड्यांपर्यंतच्या पूर्वानुमानाबद्दल अधिक खात्रीपूर्वक माहिती देता येते. त्यामुळे ९ ते १६ जुलैचा अंदाज २ जुलैला अधिक खात्रीपूर्वक वर्तवण्यात येईल.
आज हलक्या ते मध्यम सरी
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महामुंबईमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता होती. मात्र दिवसभरात पावसाच्या हलक्या सरीही पडल्या नाहीत. शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शनिवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी येथे शुक्रवार ते सोमवार या कालावधीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा. चंद्रपूर येथे शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
एक दिवस पावसाच्या, आता घामाच्या धारा
विलंबाने मुंबईत दाखल झालेल्या मोसमी पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना पुन्हा उकाड्याला सामोरे जावे लागले. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून ३० अंश सेल्सिअसच्या खाली असलेल्या तापमानाने पुन्हा डोके वर काढले. १ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत कुलाबा येथे गुरुवारी २८.८ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान बुधवारपेक्षा २.३ अंशांनी चढे होते तर सांताक्रूझ येथे पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वर पोहोचला. सांताक्रूझ येथे ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे पावसाचा केवळ शिडकावा झाला. बुधवार सकाळपर्यंत पाऊस पडून गेल्यानंतर गुरुवारी उन्हाचा तडाखा अधिकच जाणवल्याचे मुंबईकरांनी सांगितले. उपनगरांमधील केंद्रावर ३२.२ तापमानाची नोंद झालेली असताना उन्हाचा ताप मात्र त्यापेक्षा खूपच जास्त जाणवत असल्याची प्रतिक्रियाही मुंबईकरांमध्ये उमटली. मुंबईत कुलाबा येथे २४.६ तर सांताक्रूझ येथे २४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची गुरुवारी नोंद झाली.
डहाणू येथेही कमाल तापमानाचा पारा पुन्हा चढा असल्याची नोंद झाली. डहाणू येथे गुरुवारी सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. डहाणू येथे ३५ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे २४ तासांमध्ये ६८ अंशांनी कमाल तापमान चढे नोंदले गेले.
